सध्या संपूर्ण राज्यभरात मराठी आणि हिंदी भाषेचा वाद पेटताना दिसत आहे. आता या वादात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही उडी घेतली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ‘दोपहर का सामना’ बंद करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा शिकवण्याच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला आव्हान देत, सदावर्ते यांनी राज्यात तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
सदावर्ते म्हणाले, “देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, राज्यात दोन कोटी हिंदी भाषिक आहेत, तर सात कोटी लोक बहुभाषिक होण्यास उत्सुक आहेत. फक्त दोन कोटी लोक राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे विचार मांडतात. मालदीवमध्येही हिंदी भाषा अनिवार्य आहे, हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावे.” त्यांनी ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाल्याचा दावा केला आणि राज्य सरकारने तृतीय भाषा अनिवार्य करण्याचा शासकीय निर्णय पुन्हा लागू करावा, अशी मागणी केली.
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रांतर्गत पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु ठाकरे बंधूंनी त्याला तीव्र विरोध केला होता. या विरोधात त्यांनी 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने मोर्चा रद्द झाला आणि त्याऐवजी ठाकरे बंधूंनी एकत्र येत विजयी मेळाव्याचे आयोजन केले. या पार्श्वभूमीवर, सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.