मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
img
Dipali Ghadwaje
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, सतत आंदोलन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे पडसाद अधिक उमटताना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

यानंतर मराठा समाजाने राज्यभरात आंदोलने केली. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं. या आंदोलनाचे तीव्र पडसाद विधानसभा तसेच विधानपरिषदेतही उमटले.  

अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, अशी थेट मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. 

काय म्हणाले प्रवीण दरेकर?
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर मनोज जरांगेविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांची ही मागणी मान्य केली आहे.

मनोज जरांगे यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, हे आम्ही शोधून काढू असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील जरांगे यांची एसआयटी चौकशी होणार, यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group