जालना : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी जाहीर केला.
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्यात गेलं. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचंही आश्वासन दिलं.
सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो असं त्यांनी जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला. सरकारला दिलेली ही शेवटची वेळ असून काही दगाफटका केला तर मुंबईच्या नाड्या आवळू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनावर बोलताना मनोज जरांगे यांनी आपण सकारात्म असल्याचं सांगितलं. सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल आणि सर्व गुन्हे मागे घेणार असाल तर आपण राज्य सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.