गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आजपासून मुंबईकडे कूच केली आहे. अशातच सरकारकडून मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
अशातच याप्रकरणी आता महत्वाची बातमी समोर आली असून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अमरावतीमधून अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू?
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. सरकारने धोरणात्मक सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत, त्यांनी ज्या दुरुस्त्या सांगितल्या होत्या त्या दुरुस्त्या केल्या. आता ज्या काही धोरणात्मक अधिसूचना काढायला पाहिजे असे जरांगे पाटलांना वाटते त्या लगेच काढून घ्याव्या, त्यामुळे समाजाचे भलं होईल," असे आमदार बच्चू कडू म्हणालेत.
तसेच "राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पाऊल मागे यावं लागेल, त्यासोबत जरांगे पाटलांना सुद्धा मागं यावे लागेल, व समाजाचं भलं कसं होईल यादृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत, दिलेला वेळ भरपूर आहे, 54 लाख जातीचे दाखले जे द्यायचे आहे त्यांला थोडा वेळ लागेल.. असे बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले.
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मुंबई जाम होईल ती वेळ सरकारने येऊ देऊ नये, सरकारने तातडीने संपर्क साधून निर्णय घ्यावा, त्या बाबतीत सरकारसुद्धा सकारात्मक आहे, त्यामुळे सरकार जर समोर येत असेल तर जरांगे पाटलांनी सुद्धा चर्चा करून जे चांगलं होऊ शकते ते करावे.." असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.