मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बँकेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून एसटी बँकेचे संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच या प्रकरणी मोठी बातमी समोर आली असून एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिलाय. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट कारवाई करण्यात आली आहे. सहकार आयुक्तांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे.
एसटी को- ऑपरेटीव्ह बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत. कलम 79 अन्वये सौरभ पाटील यांच्यावर ही कारवाई केली आहे. सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काय आहे कारण?
सौरभ पाटील यांच्या निवडीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. सौरभ पाटील यांना बँकिग क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नाही. तसेच या पदासाठी वयाची ३५ वर्ष पुर्ण झालेली असावीत अशी अट आहे. मात्र सौरभ पाटील यांचे वय २५ च्या आसपास आहे. तसेच नियमानुसार त्यांच्याकडे आठ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभवही नाही. मात्र सौरभ पाटील हे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या निकषात बसत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधीही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी बँकेमध्ये साडेचारशे कोटींचा घोटाळ्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध बँकेच्या संचालकांनी बंड केले असून १४ संचालक राजीनामा देणार असल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या. त्यामुळे बँकेतील सदावर्तेंचे अस्तित्व धोक्यात असल्याच्या चर्चा आहेत.