नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅलीचे आज नाशिक शहरात आयोजन केलेले आहे. या करिता तपोवन परिसरात नाशिक जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर एकत्रित झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज बांधवांची प्रचंड गर्दी झाली असून तपोवनात भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप रॅलीला सुरुवात झाली नसली तरी जरांगे पाटील लवकरच येणार आहेत. विविध जिल्ह्यातून येऊन जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीचा नाशिक येथे आज जाहीर सभेने समारोप होणार आहे. नाशिकच्या तपोवन येथून निमाणी, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्तीय भागातील सीबीएस चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभेने रॅलीचा समारोप होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएस चौकात मंडप उभारण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील आता सभेतून नेमकं काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाज रॅलीला ताकदीने एकत्र आलेला आहे.