मनोज जरांगे-पाटील यांनी केली विलास पांगारकरांच्या तब्येतीची विचारपूस
मनोज जरांगे-पाटील यांनी केली विलास पांगारकरांच्या तब्येतीची विचारपूस
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री विलास पांगारकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

पांगारकरांचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. हे समजल्याने जरांगे-पाटील काल आले होते. यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, की सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

नाशिकमध्ये त्यांचे आगमन झाल्यानंतर करण गायकर, विलास बच्छाव व चंद्रकांत बनकर यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता मराठा समाजाची आरक्षण घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगून ते पुढे म्हणाले, की सरकारने जर आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर निवडणूक लढविणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आम्ही गुलाल पडू देणार नाही. सरकारला या सर्व बाबींचा परिणाम भोगावाच लागेल. आता मराठा समाज हा आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

जरांगे-पाटील पुढे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या निवडणुका पुढे ढकलाव्या. कारण हा समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता.

इतर बातम्या
Join Whatsapp Group