राज्यात आज पाच दसरा मेळावे पार पडत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरवर्षी शिवसेना ठाकरे गट तसेच शिंदे गटासह बीडच्या भगवान गडावर पंकजा मुंडेंचाही मेळावा असतो. मात्र यंदा मनोज जरांगे पाटील यांच्याही मेळाव्याची भर पडली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच नारायण गडावर दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर तोफ डागली.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
जमलेल्या विराटा समुदायाच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. इतका जनसमुदाय जमेल असं वाटलं नव्हते. नजर पुरेल इथंपर्यंत तुम्ही याल असे मला वाटले नव्हते. बीडच्या पाठीमागे सर्व रस्ते जाम आहेत. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी आहे. आपण या ताकदीने एकत्र याल, असे कधी वाटले नव्हते. हा जनसमुदाय न्यायाचा आहे. एका दुखाकडून या जनसमुदायाला सुखाकडे जायचे आहे. या समुदायावर संस्कार आहेत. ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय, या राज्यावर समुद्रासारखा पसरलाय. पण मस्तीत वागला नाही.
या नगद नारायणाने आपल्याला समतेची शिकवण दिली. या गडाची किमया आणि आशीर्वाद ज्याला मिळतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो. दिल्लीला जाऊन जे उलटले, त्यांना जनतेनं उलटवले. जर अडवणूक होणार असेल तर इच्छा नसतांनाही उठाव करावाच लागेल. का आमच्या वाट्याला अन्याय, आम्ही काय पाप केलं? आमच्या समुदायाच्या वाट्याला फक्त अन्याय आला. आमची चूक काय? कुणीतरी आम्हाला सांगा. माझा समाज राज्य आणि देश पुढे जावा म्हणून झुंजला आहे. तलवार हातात घेवून लढला आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा बांधवांकडून वचन घेतले...
"मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. तुमच्याकडून फक्त एकच वचन हवे. राजकारण आणि जातीय या गडावरुन मी बोलणार नाही. तुमच्यापुढे जाणार नाही, आणि तुमच्या हिताशिवाय पुढे जाणार नाही. मी ज्यावेळी तुम्हाला सांगेल त्यावेळी फक्त हट्ट धरु नका, जे सांगेल तेच करायचे आहे. तुम्हाला हट्ट सोडून करावेच लागेल. मग दाखवतो यांना दणका. आपल्या नाकावर टिच्चून जर कोणते निर्णय होणार असतील, तर या राज्यातील समजावर अन्याय होणार असेल तर समाजाची शान वाढवण्यासाठी गाडावेच लागणार आहे," असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला