मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. यामुळे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मराठा समाजासाठी मोकळा झाला.

मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरचा ओबीसीकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. आता ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजाने आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगने व उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. सरकारने मराठा समाजाला OBC मध्ये समाविष्ट करताच, कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयाचा विरोध करत सरसकट GR रद्द करण्याची मागणी केली आहे.
कुणबी समाजाच्या मागण्या काय ?
- मराठा समाजाला शासनाने दिलेले OBC आरक्षण रद्द करावे.
- जातिनिहाय जनगणना करावी.
- घटनाबाह्य न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी.
- OBC विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळावी.
- लोकनेते शामराव पेजे न्यासासाठी 50 कोटी निधी देणे.
- शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा व 150 कोटी रुपये आर्थिक तरतूद.
- पेजे व म्हसकर समितीच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात.
- कोकणातील कुणबींच्या खोत जमिनीवरील नोंदी कराव्यात.
- जन्माने व कर्माने कुणबी असूनही आर्थिक मागास स्थितीत असलेल्या समाजाला जात दाखला मिळवून शिक्षणातील नुकसान टाळावे.