नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली परिसरात असलेल्या संत कबीरनगर भोसला मिलिटरी स्कूलच्या मागे काळेनगर येथील सुयश अपार्टमेंटच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिला अश्विनी गणेश इंगोले (वय 33) या संत कबीरनगर, आनंदवली येथील रहिवासी होत्या. त्या नेहमीप्रमाणे काळेनगर येथील सुयश अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 3 मध्ये धुणीभांडीसाठी गेल्या होत्या. मात्र रात्री त्या घरी परतल्या नाही. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. अश्विनी या रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांचे कुटुंबिय त्यांच्या मोबाईलवर फोन लावत होते.
मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरूवात केली पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कुटुंबातील काही महिला अश्विनी जिथे काम करत होत्या त्या घराच्या गच्चीवर गेल्या. त्यावेळी त्यांना मोबाइल, पर्स, ओढणी, चप्पल सापडली. संशय आल्याने त्यांनी टाकीवर चढून पाहिले, तेव्हा त्यांना धक्का बसला.
टाकीच्या पाण्यामध्ये अश्विनी यांचा मृतदेह तरंगत होता. पोलिसांनी नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह टाकीतून बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला. मात्र डॉ. शिंगे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. दरम्यान गच्चीवर सापडलेल्या अश्विनी यांच्या पर्समध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.
या चिठ्ठीत त्यांनी, पोटाच्या आजारपणाला कंटाळून मी माझ्या स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करत आहे, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, असे लिहीले होते. त्यावरुनच ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.