एखाद्या छोट्या चुकीचा परिणाम किती गंभीर भोगावा लागू शकतो याचं उदाहरण वडोदरा येथून समोर आलं आहे. विद्यार्थ्याला शिक्षा करणं एका शिक्षकाला चांगलंच भोवलं आहे. २३ डिसेंबर २०१९ रोजी वडोदरा येथील एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्याला कानफटात मारली आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. तब्बल पाच वर्षांनी या घटनेचा निकाल वडोदरा न्यायालयाने दिला आहे. विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे.
नेमकं काय घडलं ?
जसबीरसिंह चौहान २३ डिसेंबर २०१९ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र शिकवत होते. त्याच्या वर्गातील एक मुलगा दोन दिवस शिकवणीला गैरहजर राहिला म्हणून शिक्षकाने त्याला वर्गातच जोरजोरात कानशिलात लगावल्या. या मारहाणीत त्याच्या कानाच्या पडद्यालाही इजा झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.
इतक्यात विद्यार्थ्याचे आई वडील फॉर्म भरण्याकरिता शाळेत आले होते. घडलेली घटना पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांना बघताच क्षणी जसबीरसिंह याने त्यांची माफी मागितली. मात्र संतप्त झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि जसबीरसिंह विरोधात गुन्हा दाखल केला. तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर वडोदरा न्यायालयाने चौहान याला सहा महिने तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या घटनेची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.