राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला असून आता महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याचा निर्णय भाजपचं दिल्लीतील हायकमांड ठरवणार आहे. राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदाबाबत अनेक चर्चाना उधाण आले असून आता महाराष्ट्राला कोणते मुख्यमंत्री मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पडद्यामागे प्रचंड घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात सतत फोनवरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदेंना तातडीनं दिल्लीला बोलवलं जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 48 तासानंतरही मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित नाही. महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन दिल्लीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पण या घडामोडींदरम्यान नवे मुख्यमंत्री याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
तसेच , रखडलेले प्रकल्प, लाडकी बहीण योजना, धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आणि मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.