वाशीम : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून खलबतं सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे वाशिम प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी महायुतीला कडक शब्दात इशारा दिला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत ठाकरे?
कारंजा विधानसभेसाठी उमेदवारी न दिल्यास वाशीम आणि रिसोड विधानसभेतही माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील असं, ठाकरे यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत ठाकरे हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी अजित पवार यांच्याकडे विधानसभेचं तिकीट मागितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून 2019 ची विधानसभा आणि 2024 च्या लोकसभेत थांबलो होतो. पण आता मात्र मला थांबायचं नाही. मी निवडणूक लढवावी अशी माझ्या निकटवर्तीयांची तसेच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला विधानसभेत उभं करण्याचं ठरवलं आहे. आगामी विधानसभेत महायुतीने उमेदवारी न दिल्यास इथे मैत्रीपूर्ण लढत होईल तसेच वाशीम आणि रिसोड विधानसभेतही माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी इथून दोनवेळा निवडून आले होते. आता त्यांचे पुत्र ग्यायक पाटणी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या गोष्टीची कुणकूण लागताच चंद्रकांत ठाकरे नाराज झाले आहेत. जागावाटपात युतीधर्माचे पालन केले जाणार असल्याने ठाकरे यांनी थेट महायुतीला इशारा दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे यांच्या या इशाऱ्यामुळे महायुतीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.