विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळविला असून आता राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री नक्की कोण असणार याविषयी चर्चा सुरु असताना आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपण मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचे संकेत दिले.
मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली . परंतु भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान , सत्ता वाटपाचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे. आताच्या सरकारमध्ये जसे मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री कार्यरत होते, तसे आताही नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षाकडे एक एक उपमुख्यमंत्रिपद जाईल.
दरम्यान , मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी बसणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेल्या दादा भुसे यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे.दादा भुसे हे शिवसेना पक्षातील जुने नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. यंदा सलग पाचव्यांदा ते निवडून आले आहेत. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ नेते तसेच निष्ठावंत म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.