महायुतीने महाराष्ट्र विधानसभागाजवली असून, महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. दरम्यान आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी शिवसेनेनेते आग्रही आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप पक्षश्रेष्ठींकडे स्पष्ट केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आज रात्री महायुतीच्या नेत्यांची नवी दिल्लीमध्ये अमित शाहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाहांसोबतच्या या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.