राज्यात पुन्हा एकदा महायुती सत्ता स्थापन झाली असून मात्र मंत्रिपदाचे वाटप असो किंवा पालकमंत्री पद असो यावरून महायुती सरकारमधील अनेक नेत्यांमध्ये नाराजीचे सूर असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. रायगडचं पालकमंत्रिपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र या दोनही ठिकाणी पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले हे इच्छूक होते. मात्र पालकमंत्रिपद न मिळाल्यानं भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती.
भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील इच्छा होती. मात्र त्यांना पालकमंत्रिपद मिळालं नाही, त्यांच्या ऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद मिळालं तर नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना मिळालं यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महायुती सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली, अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पाहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी तर दुसऱ्या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री पदी राहण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या अडीच वर्षांत पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.