राज्यातील विविध शहरांची नावं बदलल्यानंतर आता राज्य सरकार मजुरांना नवी ओळख मिळावी यासाठी मैदानात उतरले आहे. राज्य सरकार याबाबत
एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार आता राज्यातील प्लंबरचा दर्जा बदलण्यात येणार आहे. आगामी काळात प्लंबर्सचा उल्लेख वॉटर इंजिनिअर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाण्याची शक्यता असून, त्याचाच एकभाग म्हणून प्लंबिंगची कामे करणाऱ्या मजुरांना भविष्यात प्लंबरऐवजी वॉटर इंजिनिअर असे संबोधले जाण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे लोढा यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही लोढा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही नावात बदल केला जाणार असल्याचेही लोढा म्हणाले.