केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सुमारे दीड तास ही बैठक सुरू होती. अखेर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
भाजपने महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, इतर ठिकाणी महायुती कोणाला उमेदवारी देणार, याबाबत एक मत होत नव्हते.
त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे देखील महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ३०-१३-०४-०१ असा असणार आहे. त्यात भाजप 30, शिवसेना 13, राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि मनसे 1 अशा जागा मिळणार आहेत. त्यापाठोपाठ शिंदे गटाला १३ जागा, अजित पवार गटाला ४ जागा आणि राज ठाकरे यांच्या मनसेला १ जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मनसेला दक्षिण मुंबईतील जागा मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य म्हणजे शिवसेनेला जरी लोकसभेच्या १३ जागा मिळणार असल्या, तरी यातील ५ ते ६ जागांवरील नवीन उमेदवार देण्यात यावेत, अशी चर्चाही झाली आहे.
त्यामुळे शिंदे गटातून नेमकं कुणाचं तिकीट कापलं जाणार? याकडेही सर्वाचं लक्ष लागून आहे.