राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी देखील शरद पवार यांची अचानक भेट घेतली. पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेण्यासाठी गर्दी केली होती. महत्वाची बाब म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी देखील शरद पवार यांची अचानक भेट घेतली. पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटातील नेते करीत आहेत. यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होऊन अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांच्याकडे परततील का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच ए. वाय पाटील यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.
कोण आहेत ए.वाय पाटील?
शरद पवार यांची अचानक भेट घेणारे ए.वा पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर विशेष पकड आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या काही काळात ते अजित पवार यांची साथ सोडणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. ए.वाय पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी उत्सुक होते. पण त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कुचबूज सुरू झाली. अशातच पाटील यांचे काँग्रेससोबत जुळले नाही, तर ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवू शकतात.