मोठी राजकीय बातमी! महायुतीतून मोठा नेता बाहेर पडणार?
मोठी राजकीय बातमी! महायुतीतून मोठा नेता बाहेर पडणार?
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू लवकरच महायुतीतून बाहेर पडणार, अशी माहिती एका वृत्त संस्थेच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. लवकर बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे. 

आमदार बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. मात्र, शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीकडून बच्चू कडू यांना कोणतेही मंत्रीपद मिळाले नाही. त्यांना फक्त दिव्यांग मंत्रालयावरच समाधान मानावे लागले.

मागील काही महिन्यांपासून महायुतीतील नेते आणि बच्चू कडू यांच्यात वादाचे फटाके फुटत असल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीतही आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात अमरावतीतून प्रहारचा उमेदवार उभा केला होता. त्यामुळे बच्चू कडू आणि महायुतीत सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी भेट घेऊन नव्या युतीबाबत चर्चा केल्याचं समजतंय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी देखील नव्या युतीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group