लोकसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया संपली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आले आहे. एनडीमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळाही झाला आहे.
दरम्यान या निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून रणधुमाळी सुरु होती. आरोप-प्रत्यारोप होत होते. राज्यात मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकाल सर्वाधित चर्चेत राहिला. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली.
या मतदार संघात इव्हीएम मशिनमधील मतमोजणीत रवींद्र वायकर फक्त एका मताने आघाडीवर होते. परंतु पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना 47 मतांची मदत झाली आणि त्यांनी अमोल किर्तीकर यांना 48 मतांनी पराभूत केले. परंतु त्यांच्या या विजयावरुन अजूनही वाद सुरु आहे. आता दोन पक्षांनी त्यांचा विजय मॅनेज असल्याचा आरोप करत थेट पोलीस ठाणे गाठले आहे.
कोणी केला आरोप
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज आहे, असा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती. त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला, असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला आहे. या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस कारवाई करत नसून पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचे भरत शहा यांनी म्हटलंय. दरम्यान रवींद्र वायकर यांची शपथ होण्याआधी यासंदर्भात कारवाई व्हावी अशी मागणी त्यानी केलीय.
ठाकरे गटाकडून आक्षेप
रवींद्र वायकर यांच्या विजयावर यापूर्वी शिवसेना उबाठाकडून आक्षेप घेण्यात आला होता. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी शिवसेना उबाठाकडून करण्यात आली. आता आणखी दोन पक्षांनी या विजयासंदर्भात आरोप केले आहे. यामुळे रवींद्र वायकर यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.