आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील मुख्य नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विधानसभेचा प्रचार, खास रणनितीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अवघ्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. विधानसभेसाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून काल वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असून प्रचाराची खास रणनिती ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सभा, रॅली अन् मेळाव्यांमधून महायुती महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
कसा असेल महायुतीचा प्रचार?
२० ऑगस्टपासून महायुतीच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. विधानसभेसाठी महायुती राज्यभरात समन्वय मेळावे घेणार आहे. याशिवाय एक संवाद दौरा, लाभार्थी दौरा आणि प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या एकत्रित सात सभा राज्यभरात होणार आहेत. तर आठवी आणि शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे.
दरम्यान, विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची योजना आखली असून मुंबईमधील अनेक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.