महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे.
दरम्यान आता भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ काळ भाजप मध्ये राहिलेले ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आपल्याला त्रास देत असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांच्या त्रासामुळेच आपण पक्ष सोडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ढोबळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेत तुतारी हाती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या निर्णयाने महायूतीस मात्र मोठाच धक्का बसला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये लक्ष्मण ढोबळे यांनी पवारयांची भेट घेतली आहे. ते मोहोळ मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते. ढोबळे हे विधानसभा निवडणूक 2019 च्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले होते. मात्र, पक्षात येऊन दहा वर्षे झाली. तरीदेखील पक्षाने डावलले जात असल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अजित पवार आपल्याला त्रास देत होते. त्यांच्या त्रासाल कंटाळून आपण भाजपमध्ये आलो. पण, आता ते भाजपसोबत आल्यावर पुन्हा त्रास देऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळूनच आपण भाजप सोडत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश घेत तुतारी हाती घेत असल्याचे ढोबळेयांनी म्हटले आहे. एका वृत्ताने याबाबत वृत्त दिले आहे. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल, पण आता आपण तुतारीच हाती घेणार असल्याचा आत्मविश्वासही ढोबळे यांनी या वाहणीशी बोलताना व्यक्त केला आहे.