विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार मध्ये जागा वाटपावरून मोठी रणनीती सुरू आहे . दरम्यान भाजपने आपल्याकडे जास्त जागा असतील असा
दावा केला तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . दरम्यान भाजपने विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढविण्याची तयारी झालेली आहे. यादीतील उमेदवारांची जिंकण्याची क्षमता अधिक असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांनी १०७ जागांवर दावाच सांगितला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. भाजपने १६० जागांवर निवडणूक लढावी, असा सूर बैठकीत उमटला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यासंबंधीची तयारी केलेली असल्याचीही बैठकीत चर्चा झाली. जागावाटपासंबंधी भाजपच्या या आक्रमक रणनीतीसमोर न झुकता आपले म्हणणे भाजप नेतृत्वासमोर मांडावे, असा शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना आग्रह होता. शिंदेंनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे तयारी आणि उमेदवारांची निवड यासंबंधीचे सादरीकरण भाजप नेतृत्वासमोर केले.
शिवसेना शिंदे गटाची १०७ जागांवर लढण्याची तयारी आहे. तसेच आमच्या इच्छुक १०७ उमेदवारांची निवडणुकीच्या अनुषंगाने असलेली तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही निवडलेल्या उमेदवारांची जिंकून येण्याची क्षमता इतर उमेदवारांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे आम्ही उमेदवारांची निवड करताना जातीय समीकरणांचा योग्य समतोल ठेवून त्याचा अधिक फायदा कसा होईल, ते पाहिले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सादरीकरणात आवर्जून सांगितले.