नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार महायुतीचं सरकार बनताना दिसत आहे. आतापर्यंत महायुतीने २८८ पैकी तब्बल २२५ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. तर, भाजपने एकट्याने १३० जागां मिळल्याचं चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. तर राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. देवेंद्र फडणवीस हे सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले होते. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र होते.
महाराष्ट्रातील 288 विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे अपडेट हाती येत असून भाजप महायुतीला तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असे चित्र दिसून येते. या निकालानंतर भाजप महायुती मधील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.
भाजपने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांचे यश बघता त्यांच्या मातोश्री भावुक झाल्या आहेत. तर फडणवीस याचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी पहिल्यांदाच पुढे येत आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आईची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना त्यांच्या आईचा पहिला फोन आल्याची माहिती आहे. असा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आईसोबत फोनवर बोलताना दिसत आहे. भाजप महायुतीला मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची आई सरिता फडणवीस यांनी नागपूरहून फोन केला असल्याची शक्यता आहे.
तर यावर बोलताना सरिता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत असताना विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. तसेच लाडक्या बहीणींनी महायुतीच्या उमेदवारांना साथ दिली यावर प्रश्न केला असता, मला मुलगी नाही, मात्र या योजनेच्या निमित्ताने असंख्य मुली मला मिळाल्या असल्याचे ही सरिता फडणवीस म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींचे खूप लाडके आहे. तो परत मुख्यमंत्री होईल, असे मला वाटते. या विजयासाठी देवेंद्र फडणवीसांनी खूप मेहनत घेतली आहे. तो २० - २० तास काम करायचा. माझी व त्याची भेट फक्त जेवणच्या टेबलवर व्हायची, असेह त्या म्हणाल्या.