१८ नोव्हेंबर २०२४
नाशिक (चंद्रशेखर गोसावी ) :- विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी काही तास आधी नाशिक शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम महसूल विभागाच्या भरारी पथकाला सापडली असून, ती एका राजकीय नेत्याची असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
याबाबत प्रशासकीय सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या अधिक माहितीनुसार निवडणुकीचा प्रचार हा आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागासह निवडणूक कामासाठी विविध यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यातच नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली.
या माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी हॉटेलमध्ये एका पिशवीमध्ये दोन कोटी रुपयांहून अधिक रक्कम आढळल्याचे वृत्त आहे. ही पिशवी महसूल विभागाच्या पथकाने जप्त केली.
दरम्यान, या ठिकाणी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथकदेखील दाखल झाले. या ठिकाणी एमएच 41 पासिंग असलेली एक गाडीदेखील सापडली असून, ती एका राजकीय नेत्याची असल्याची चर्चा सुरू आहे. सध्याच्या निवडणूक प्रचार काळात प्रथमच नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रक्कम सापडली आहे.
Copyright ©2024 Bhramar