महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राज्यात सर्वत्र महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांच्या सभा सुरु आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यात प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. येत्या 18 तारखेला संध्याकाळी प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल , अशातच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने कोसळले.
त्यामुळे विलास भुमरे यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भुमरे यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विलास भुमरे यांच्यावर थोड्याच वेळात शस्त्रक्रिया होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून गेल्या पंधरा दिवसापासून ते रात्रंदिवस प्रचार करत आहेत. विलास भुमरे हे खासदार आणि माजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. ते पैठणमध्ये महायुतीकडून मैदानात उतरले आहेत. आज पहाटे भोवळ आल्यामुळे भुमरे कोसळले.
ऐन विधानसभा निवडणुकीत दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याची वेळ आली आहे. विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत.
विलास भुमरे हे खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. विलास भूमरे यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम पाहिलेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून विजय मिळवला. संदीपान भुमरे दिल्लीच्या राजकारणात गेल्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.
पैठण मतदारसंघात विलास भुमरे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्यासोबत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून विलास भूमरे यांनी प्रचाराचा धडाका लावला. सभा अन् गावभेटी करत त्यांनी जोरात प्रचार केला. पण मोक्याच्या क्षणी त्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार थांबलाय.