भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
आज दुपारी १२ वाजेपर्यंतच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र अद्याप दुसऱ्या कोणत्याही पक्षाने विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार आहे.
राज्यातील 288 नव्या आमदारांच्या शपथविधीसाठी सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. काल तब्बल 170 आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर रविवारी उर्वरित आमदारांचा शपथिधी पार पडेल. यानंतर सोमवारी नवनिर्वाचित आमदार विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडतील.
विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित आहे. महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.
महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदावर दावा सांगितला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सोमवारी राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील. राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांची ही इच्छा अधुरीच राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.