सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असून त्यांच्यामागे अनेक स्थानिक गावकरी दिसत आहेत. या स्थानिकांबरोबर त्यांची बाचाबाची झाल्याचं दिसतंय. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये जमीन मोजणीसाठी गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओबाबत जाब विचारला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ब्रेकिंग, विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? संजय राऊत यांनी व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि पीएमओला सुद्धा टॅग केलं आहे. दरम्यान, व्हिडिओत राहुल नार्वेकर यांच्यासह जमीन मोजणीसाठी आलेल्या सहकाऱ्यांसमोर एक दाम्पत्य अत्यंत आक्रमक पद्धतीने बोलताना दिसून येत आहे. आम्ही घरात नसल्याची संधी साधत तुम्ही आतमध्ये शिरता का? अशी संतप्त विचारणा महिला करताना दिसून येत आहे.
दाम्पत्याचा संताप पाहून राहुल नार्वेकर काढता पाय घेताना दिसून येतात. महिलेची नार्वेकरांच्या सहकाऱ्यांसमवेत झटापट सुरु असतानाच मागून व्हिडिओ कर असा आवाज येताच राहुल नार्वेकर मान खाली घालून अगतिकपणे जाताना दिसून येत आहेत. दरम्यान, संतापलेल्या दाम्पत्याला राहुल नार्वेकर भांडणे करू नका असे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण जमिनीमध्ये मोजणी करत असल्याने दाम्पत्य चांगलंच भडकल्याचे दिसून येत आहे.
संजय राऊत माध्यमांना काय म्हणाले?
“सरकारी मोजणी करण्याकरता अधिकारी हे महाशय गेले, जमिनीचे मोजामाप करायला. ही जागा गुजरातच्या एका गुंतवणूकदाराच्या नजरेत भरली. त्या जागेचे मालक घरात नसताना, त्यांच्या घरी एक लग्न समारंभ होता. ते घरात नाहीत हे पाहून हे अधिकरी त्यांच्या जमिनीवर गेले. मोजणी सुरू केले. त्यांना जेव्हा कळलं की मोजमाप सुरू केली तेव्हा ते कुटुंब तिथे आले. त्या माऊलींनी अनेकांच्या कानफाट्यात मारल्या, तोही व्हिडिओ समोर येईल. या गुजरातच्या टोलधाडी, भाजपाचे पुढारी, सत्तेवरची मंत्री आणत आहेत. कोकणचं स्मशान करत आहेत. त्याचा भडका या म्हात्रोळी गावात उडाला. मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी या महाराष्ट्राला दाखवलं”, असं संजय राऊत म्हणाले. तसंच, अलिबाग मराठी माणसांचं राहिलं नाही, गुजरातच्या लोकांनी अलिबागसारख्या शांत सुंदर शहराचा ताबा घेतला आहे, असंही ते म्हणाले.