राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षावर सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढवून मागितली होती, मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्या अशी मागणी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. राहुल नार्वेकरांनी निकालासाठी वेळ वाढवून देण्यासाठी कोर्टात ४ दिवसांपूर्वी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणाची सुनावणी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण बंद होईल, अशी हमी वकिल तुषार मेहता यांनी दिली आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशामुळे राष्ट्रवादी चिन्ह अन् पक्षाचा निकाल या आठवडयात कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचं आहे.