नवरात्रीत पहिली सुनावणी, दिवाळीनंतर उलट तपासणी; आमदार अपात्रतेचं संपूर्ण वेळापत्रक आलं समोर
नवरात्रीत पहिली सुनावणी, दिवाळीनंतर उलट तपासणी; आमदार अपात्रतेचं संपूर्ण वेळापत्रक आलं समोर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार तर 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणर आहे.  शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना पाठवलेल्या आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणीच्या वेळापत्रकाची प्रत समोर आली  आहे. नवरात्रीत  कागदपत्रांची सुनावणी होणार आहे. तर दिवाळीनंतर उलट तपासणी होणार आहे. 

दरम्यान शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात आला आहे. अध्यक्षांकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही गटांचे आमदार आणि बाजू मांडणारे वकील हे आता पुढील रणनीती ठरवणार आहे. 

 25 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती.या सर्व गोष्टींचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सर्व आमदारांना हे वेळापत्रक आज सकाळी पाठवण्यात आले आहे. 

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक
  • 13 तारखेला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी 
  • 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार
  • 20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला देणार
  • 20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्रे एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार
  • 27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं ( स्टेटमेंट) मांडणार 
  • 6 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपली बाजू  मुद्देसूद मांडतील. त्यानंतर दावे आणि प्रतिदावे करतील
  • 10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने  सुनावणी पार पडणार
  • 20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार
  • 23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार
  • सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार

अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरु असताना राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर
विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवडा परदेश दौऱ्यावर आहेत.  घाना या देशात पार पडणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस हजेरी लावणार  आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राहुल नार्वेकर घाना दौऱ्यावर जाणार आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरु असताना अध्यक्ष दौऱ्यावर जाणार आहेत. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत  परिषद होणार आहेत. जगातील विविध देशांतील संसद व विधीमंडळ प्रमुख सामील होणार आहे. जागतिक संसदीय व राजकीय प्रश्नावर विचारमंथन होणार आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group