आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादाची मालिका दोन - तीन दिवसांपासून सुरू होती. गुरुवारी आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला लाजवेल असा जोरदार राडा झाला. या भांडणावर संपूर्ण महाराष्टातून टीका होत असताना या वादावर अखेर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली आहे. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा अशा सूचनाही केल्या आहेत. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले आणि नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध चौकशी करुन विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे, असेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले.
कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेशिका नसताना अनधिकृतपणे हे अभ्यागत विधानभवनाच्या आवारात आले. त्यांनी मारामारी करुन आक्षेपार्ह कृत्य केल्याच दिसून येते. विधानमंडळाच्या प्रसिमेममध्ये अशी घटना यापूर्वी कधीही झालेली नाही. या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणत आहे की, विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्त्व आणि जबाबदारी आहे. विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर संबोधले जाते. त्यामुळे, दोन्ही सदस्यांनी सभागृहात खेद व्यक्त कराव्या, अशा सूचनाही अध्यक्षांनी केल्या होत्या. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी या दोघांना सभागृहात आणल्याबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा, तसेच, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दखल घ्यावी, अशा सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत.