शिंदे गट अपात्र झाल्यास पुढे काय? महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
शिंदे गट अपात्र झाल्यास पुढे काय? महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकालाचे वाचन होईल. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवले तर मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याबाबत चर्चा सुरू आहे.  एकीकडे भाजप नेते जरी या निकालाचा सरकारला काही धोका नाही, असे सांगत असले तरी शिंदे गट अपात्र ठरल्यास राज्यात मोठा भूकंप होईल.

मुख्यमंत्रीच अपात्र ठरल्याने सरकार बरखास्त होईल. त्यानंतर राज्यपाल पुन्हा राजकीय पक्षाला सत्तास्थापनेचे आमंत्रण देतील. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी माध्यमांसोबत बोलताना आमचे सरकार स्थिर राहणार असल्याचे सांगितले होते. आमची युती कायदेशीरदृष्ट्या वैध आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असं देखील फडणवीस म्हणाले होते.

 कायदेतज्ज्ञांच्या मते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या विरोधात निकाल दिल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीने राजीनामा द्यावा लागेल. तांत्रिकदृष्ट्याही सरकारला संकटाचा सामना करावा लागेल.

शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लान बी तयार
शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यास महायुती सरकार कोसळेल. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपने प्लान बी तयार ठेवला आहे. विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपकडे सध्या १०४ जागा आहेत. अजित पवारांनी हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या ४० जागा आणि मित्रपक्षाला सोबत घेऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकते.

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार?
शिंदे अपात्र ठरले तरी राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार आहे. पण नवीन मुख्यमंत्री कोण असतील, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. अशातच भाजप राज्याचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभेचा अत्यंत कमी कालावधी उरला असल्याने भाजप ही खेळी करू शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group