अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा प्रस्ताव नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा प्रस्ताव नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक आणण्यात येणार असल्याच्या चर्चेवरुन महाड येथे निषेध आंदोलन केले. मनुस्मृती पुस्तके फाडून आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर हे आंदोलन केले होते.

मात्र, मनुस्मृती पुस्तकं फाडत असताना त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडला गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपने आव्हाडांच्या या कृतीविरोधात आज राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. तर, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आव्हाडांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शालेय अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक आणला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर असून उत्तर प्रदेशात 7व्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी ते पोहोचले आहेत. काशी येथे काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही", असे फडणवीस यांनी म्हटले.

तसेच, शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकाच्या सहभागावरही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, मी काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पाहायला आलो आहे. काशी येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असेही फडणवीसांनी काशीतून बोलताना म्हटले. 

मनुस्मृतीच्या श्लोकावर फडणवीसांचे भाष्य

कुठल्याही अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा विचारदेखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी केलेला नाही, कधीही आलेला नाही, त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, असे म्हणत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांनीच ही चर्चा आणली, त्यांनीच आंदोलन केले आणि जेव्हा खोटं आंदोलन करताना माणूस कसं काम करतो, हे आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडला. पण, महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group