"सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही" ; जितेंद्र आव्हाडांचा राजेंवर हल्लाबोल!
img
Dipali Ghadwaje
ठाणे : लोकसभेच्या सातारा मतदारसंघात भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली तर, त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी लढत सातारा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 वी उमेदवारांची यादी जाहीर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. मात्रया उमेदवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेदरम्यन जितेंद्र आव्हाडांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. 

काय म्हणाले  जितेंद्र आव्हाड? 

“छत्रपतींची कोल्हापूरची गादी अथवा सातारची गादी असो. या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपतींच्या वंशजांनी ही गादी आचारविचाराचे पालन करुन पुढे चालवली पाहिजे. पण उदयनराजे यांची कृत्य, दुष्कृत्य साताऱ्यात आणि सगळीकडे बघितली आहेत. त्यांचं वागणं गादीचा सन्मान ठेवणारे असते तर ठीक होते. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. आजही छत्रपतींच्या गादीला सर्वजण मान देतात, त्या गादीचा मान ठेवायला पाहिजे होता. आपण कोणासमोर झुकत आहोत, याचा विचार उदयनराजे यांनी केला पाहिजे होता. पण साताऱ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी ते चार दिवस दिल्लीत होते. दिल्लीच्या तख्तासमोर मला तिकीट द्या, तिकीट द्या, असे सांगत होते. ही गोष्ट लोकांना फारशी आवडणार नाही”, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी टीका केली.

“शशिकांत शिंदे हा अत्यंत गरीब घराण्यातून आलेला माणूस आहे. त्यांच्या घरची परिस्थिती राजेंनाही माहिती आहे. शरद पवारांनी कायम ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची ताकद, हिम्मत, कर्तृत्त्व आहे त्यांना मोठं केलं. त्याचा वारसा काय हे कधीच बघितले नाही. शशिकांत शिंदे हा गरीब घरातला माथाडी कामगार आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी राजेंना अंगावर घेतले आहे. त्यामुळे खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे आहेत. शशिकांत शिंदेच जनतेला न्याय देऊ शकतात. सत्तेपुढे नतमस्तक होणारे कधीच न्याय मिळवून देऊ शकत नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
 
“शाहू महाराजांना जसं घरी बसून तिकीट दिलं, त्यांना कुठे तिकीट द्या, तिकीट द्या, करत फिरावे लागले नाही. साताऱ्याच्या गादीचा इतिहास फार मोठा आहे. अशाप्रकारे तिकीट मिळवणे म्हणजे त्या गादीचा अपमान आहे. तुम्ही ज्याचा वारसा सांभाळता त्या गादीने एकेकाळी दिल्लीला आव्हान दिले होते. त्या गादीवर बसलेला वारस हा जर दिल्ली पुढे नतमस्तक होत असेल तो तुमचा नाही, तर उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे”, अशीही टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group