खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना नारळ देण्यात येणार आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. संजय शिरसाठ, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागेल. संपूर्ण मंत्रिमंडळाची साफसफाई करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याविषयी दिल्लीत चर्चा आहे. भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी वक्तव्य, लेडीज बार, घोटाळे, पैशांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे, यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली आहे असे संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तींयाकडे बोट दाखवत गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या या बॉम्बगोळ्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. काल झारखंड येथून एक पथक आले. तिथल्या एसीबीचं हे पथकं होतं. त्यांनी अमित साळुंके या व्यक्तीला अटक केली. सुमित फॅसेलिटीजचे नाव त्यात समोर येत आहे. राज्यात 800 कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा झाला. 100-200 कोटींचे टेंडर 800 कोटींवर नेण्यात आले. 650 कोटींनी टेंडर वाढवण्यात आले. सुमीत फॅसेलिटीज, 108 नंबर ॲम्बुलन्स, तुम्हाला आठवते का? तर त्याचे सूत्रधार हे अमित साळुंके आहेत.
हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन आहे. त्याचा कणा हा अमित साळुंके असल्याचा दावा राऊतांनी यावेळी केला. झारखंड मद्य घोटाळ्यात हे पथक येथे आले आणि अमित साळुंके याला अटक केली. ॲम्बुलन्स घोटाळ्यातील पैसा शिंदेकडे वळवला की त्याला इतरत्र पाय फुटले याचा तपास होणार आहे. ही अटक सहज झालेली नाही, यावर राऊतांनी जोर दिला. या ॲम्बुलन्स आणि मद्य घोटाळ्याची पाळंमुळं शोधण्यात येणार आहे. त्याचे राज्याच्या मंत्रिमंडळाशी कनेक्शन समोर येत आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला, निवडणुकीसाठी त्याचा कसा वापर झाला हे समोर येणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना मंत्रिमंडळाची साफसफाई करावी लागेल, असा दावा राऊतांनी केला.