धाराशिव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेलं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडखोरीबद्दल प्रसिद्ध वकील असीम सरोदेंनी काही धक्कादायक विधानं केली आहेत. गुवहाटीमधून घडलेल्या सत्ता नाट्यादरम्यान काही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप असमी सरोदे यांनी केले आहेत.
विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे आरोप केलेत. धाराशीवमध्ये रविवारी 'निर्भया बनो' सभेत बोलताना सरोदे यांनी शिंदे गटातील आमदारांचा संदर्भ देत गंभीर आरोप करताना या प्रकरणाची चौकशी करायला हवी अशी मागणी केली आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवेळी अनेक सेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, त्यांच्या याच गुवाहाटीतील दौऱ्याबाबत ऍड असीम सरोदे यांनी मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत.
निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना ऍड असीम सरोदे म्हणाले की, "गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यावर 2 आमदाराना मारहाण करण्यात आली होती. तसेच, स्पाईस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेस यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये इतर लोकांना प्रवेश नव्हता, दारूच्या नशेत झिंग होऊन हे सगळे तिथे गेले होते असेही सरोदे म्हटले आहेत.
नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?
"शिवसेना फोडत असतांना भाजपच्या माध्यमातून जो घोडेबाजार झाला आहे, ज्यात एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले. ते गुवाहाटीला गेले. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगत आहे.जी माहिती आतापर्यंत कधीही पुढे आलेली नाही. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेला, मात्र आठ किलोमीटरवरून त्यांना परत पकडून आणण्यात आले. त्यानंतर त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एका आमदाराला मारहाण झाली. त्या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे. गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही ग्राहकांना परवानगी नव्हती. परंतु, स्पाईस जेट व इंडिगो या कंपनीकडून आधीपासूनच या हॉटेलमध्ये काही रूम बुक करण्यात आलेल्या होत्या. त्यांचा तो वार्षिक करार होता. त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे,एअर होस्टचा विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा करण्याचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्राने शोधले पाहिजे. याचं खरं चरित्र आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या-मोठ्या मंत्री पदावर बसले असले, तरीही या पैश्याचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही," असे सरोदे म्हणाले.