मोठी बातमी : नीलेश राणेंचा भाजपला रामराम , हाती बांधणार शिवबंधन
मोठी बातमी : नीलेश राणेंचा भाजपला रामराम , हाती बांधणार शिवबंधन
img
Dipali Ghadwaje
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करतील. 

निलेश राणे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. आज निलेश राणे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. मी २०१९ ला नारायण राणे साहेबांसोबत भाजपमध्ये आलो. इथे खूप सन्मान मिळाला. अनेक नेत्यांनी आदर दिला. प्रेम दिलं. इथे शिस्त पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण यांनी ही लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्याच नेत्यांनी चांगली वागणूक दिली, असे निलेश राणे म्हणाले.

आताची निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जात आहोत. त्यामुळे नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर आता मी निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या हितासाठी मला जे करता येईल ते मी करेन. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहतील, असे निलेश राणेंनी म्हटले.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group