नाशिक : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला आज, मंगळवार दिनांक 2 मे रोजी हजेरी लावणार आहेत. विलास शिंदे हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लग्नाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा सुरू झाली आहे.
गत विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या बऱ्याच राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचे दोन गटांत रूपांतर झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली.
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात राज्यात महायुतीची सत्ता आली. शिवसेना शिंदे गट हा या महायुतीमधील घटक पक्ष असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे.
आता महापालिका निवडणुका जिंकण्याचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून अशातच राजकीय घडामोडीही जोर धरत आहेत. शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेल्या नाशिकमधील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपसह शिवसेना शिंदे गटाकडून सुरू आहे.
अशातच विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण स्वीकारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे यांच्याकडून जाळे टाकण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हेदेखील एका विवाह सोहळ्यानिमित्त आज (दि. 2) नाशिकमध्ये येत आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच विवाह सोहळ्यानिमित्त नाशिक मुक्कामी असून, आज व्हीव्हीआयपींची शहरात मांदियाळी असणार आहे.