महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये तसे एकीचे वारे वाहू लागलेत.
मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे बॅनरही लागलेत. त्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या शक्यतेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतर युतीवर चर्चा होईल, असे संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केला, उद्धव ठाकरे यांनीही हात दिला आहे. काही दिवस जाऊ द्या, राज ठाकरे मुंबईत आल्यावर युतीवर चर्चा होईल, असे संजय राऊत म्हणाले. राजकारणामुळे नाती तुटत नसतात, उद्धव ठाकरे हे युतीबाबत कमालाचे सकारात्मक आहेत, असे सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत.
मध्यस्थीची गरज नाही - राजकारणामुळे नाती तुटत नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात कोणत्याही नेत्याला मध्यस्थीची गरज नाही. दोन्ही भावांच्या मनात मराठी माणसाचे हित आहे.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी ज्यांना एकत्र यायचे आहे, त्यांनी यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केली. रिपब्लिकन पक्षातील एका गटानेही शिवसेनेशी संपर्क साधला आहे, त्यांनाही या प्रवाहात सामील व्हायचे आहे, असे यावेळी संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं - मराठी माणसाचं नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे, त्यांनी यावं, असे संजय राऊत म्हणाले. त्याशिवाय संजय राऊत यांनी राज ठाकरेंसोबतचे संबंधावरही भाष्य केले. राज ठाकरे यांच्या कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सांगितले. आम्ही बराच काळ एकत्र राहिलो आहोत.
राजकीय मतभेद असले तरी ओलावा कायम आहे. मी तर दोन्ही घरचा पाहुणा आहे. उद्धव ठाकरे काय राज ठाकरे काय आम्ही बराच काळ एकत्र राहिलेलं आहोत. राज ठाकरे यांचे वडील आणि माझं अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे संजय राऊत म्हणाले.