नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाझे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने नाशिक जिल्ह्यात चांगली कामगिरी केली.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्यांच्या पक्षाचे अवघे 20 आमदार निवडून आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही. अशातच नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्षप्रवेश झाला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शेकडो एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.