मुंबई : विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागला. पराभवाचे ओझे दूर सारून शरद पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला.
शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर झालेल्या निकालाने अनेकांना धक्का दिला. शरद पवार आगामी काळासाठी पक्षात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याची तयारी करत असून भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान आता पक्षातील विविध पदांवर बदल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे . युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष , महिला प्रदेशाध्यक्ष आणि विविध सेल प्रमुख यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार असून, या बैठकीत पक्षांतर्गत बदलावर चर्चा होईल.
8 जानेवारीला सर्व सेलचे प्रमुख, आमदार, खासदार आणि विभाग प्रमुखांची बैठक होईल, तर 9 जानेवारीला शरद पवार आमदार, खासदार, माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर पक्षातील प्रमुख बदल करण्यात येतील.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भविष्यावरही चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या ‘भाकरी फिरवण्याच्या’ निर्णयामुळे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर कोणताही निर्णय घेतला जाईल, याबाबत सस्पेन्स कायम आहे.
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवण्याच मागणी एका गटाने केली आहे. अजित पवारांनी फूट पाडून वेगळी चूल मांडल्यानंतर अनेक नेते, आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.