२०२४ विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि अजित पवार यांना ४१ जागांवर यश मिळाले.
महायुतीनं यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
दरम्यान आठवड्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सागर बंगल्यावरच आहे. तर एकनाथ शिंदे वर्षा निवसस्थानी आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे वर्षा बंगलाच असतो. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. पण देवेंद्र फडणवीस सध्या सागर बंगल्यावर राहत आहेत.
मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगला मिळाला होता. आता या सरकारमध्ये अद्याप खातेवाटप पूर्ण झालेले नाही. खातेवाटप झाल्यानंतर बंगल्याचे वाटप केले जाईल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा निवस्थानावर जातील, असे सांगितले जातेय.
ठाकरेंचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर मुक्कामी आहेत. अशातच मिळालेल्या माहितीनुसार , दोन ते तीन दिवसांत एकनाथ शिदे वर्षा निवास स्थान सोडणार आहेत. एकनाथ शिदे यांचे बंगल्यावरील सर्व सामान शिफ्ट करण्यात आलेय. फक्त सरकारी कामांमुळे अद्याप ते वर्षावर असल्याचे समजतेय. पुढील दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे वर्षा निवसस्थान सोडतील.
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात कधी शिफ्ट होणार?
२०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी वर्षा बंगल्यावरून त्यांनी महाराष्ट्राचा गाडा हाकला होता. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरून महाराष्ट्रातील सूत्रे हाताळणार आहेत. देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनानंतरच वर्षा बंगल्यावर येण्याची शक्यता आहे.