महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे बहुधा येत्या ५ डिसेंबरलाच समजणार आहे, अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद हवे आहे अन्यथा गृहमंत्री पद व इतर चांगली खाती हवी आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्ट्राईक रेट जास्त असल्याने शिंदेंएवढीच मंत्रिपदे हवी आहेत. या सगळ्या पदवाटपात महायुतीचा शपथविधी लांबला आहे.
अशातच शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. शिंदेंना हवे ते मंत्रिपद देण्यासाठी अद्याप भाजप नेत्यांकडून होकार आलेला नाही, यामुळे राज्याच्या राजकारणात रंगत आली आहे. आझाद मैदानावरील तयारी पाहण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकटेच गेले होते. यावर शिंदे गटाने नाराजीचा सूर आळवला होता.
यामुळे आज शिंदे गटाच्या नेत्यांना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला आहे. यावेळी शिंदे गटातून गुलाबराव पाटील, संजय शिरसाट यांना पाठविण्यात आले होते. तर राष्ट्रवादीतून धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील हे आझाद मैदानावर आले होते. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते. भाजपाने पाठविलेले निरीक्षक आज सायंकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी रुपाणी यांनी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असे वाटत असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा सस्पेंस संपण्याची शक्यता आहे.