वरळीत यंदा तिरंगी लढत होत आहे. येथे शिवसेनेचे (ठाकरे) विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मिलिंद देवरा व मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी आव्हान दिलं आहे. अशातच वरळीतून एक मोठी बातमी दामोर आली आहे .
वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने एक बनावट पत्र वायरल केलं असल्याचा आरोप मनसेकडून होत आहे. हे पत्र लोकांना दाखवलं जात आहे. या पत्रावर राज ठाकरे यांची बनावट सही देखील असून त्यांनी वरळीत शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असल्याचा दावा या पत्राद्वारे केला जात आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचे (शिंदे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. तसेच वरळीकरांना आवाहन केलं आहे की शिवसेनेच्या (शिंदे) या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नका. मनसेचे वरळीतील अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे यांनी आपण याप्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “शिवसेनेचे (शिंदे) शाखाप्रमुख राजेश कुसळे हे वरळी मतदारसंघात खोटा प्रचार करत आहेत. मनसेने शिवसेनेचं (शिंदे) समर्थन केलं असल्याची बतावणी केली जात आहे. शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांकडून वरळीत खोटा प्रचार चालू आहे.
या मतदारसंघात त्यांचा पराभव होणार असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना माहिती आहे की ते पराभूत होणार आहेत. म्हणूनच अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे. माझं वरळीकरांना आवाहन आहे की शिवसेनेच्या शिंदे या खोट्या प्रचाराला कोणीही बळी पडू नका. शिवसेनेच्या (शिंदेः शाखाप्रमुखाविरोधात व पदाधिकाऱ्यांविरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहोत. वरळीकरांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. निवडणूक आयोग व पोलीस शिवसेनेवर (शिंदे) कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे.