नाशिक : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात होती. मात्र, आता भाजपच्या बड्या नेत्याच्या नाराजीमुळे राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक महापालिकेला गेल्या सहा वर्षात तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नाही. त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाला आहे. डॉ. अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतल्याचे दिसून आले. त्यात दोन निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे कारभार पूर्णपणे भरकटल्याचे चित्र आहे.
त्यामुळे नाशिकसाठी आयएएस अधिकारी द्यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यामुळे महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे नाशिक आयुक्तपदाची धुरा सोपवली.
मात्र, भाजपच्या बड्या नेत्याने आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची गळ घातल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्याचे ऐकण्याचा निर्णय घेतल्यास नाशिक महानगर विकास प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता पदभार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.