नवी दिल्ली : देशात प्रवासी विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. रविवारी २४ विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या. त्यापैकी २० विमानांचे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवडाभरात ९० पेक्षा जास्त विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या असून, त्यामुळे सुमारे २०० काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डीजीसीएप्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी केली आहे.
गृहमंत्रालयाला हवा अहवाल
बाॅम्बच्या धमकीचे प्रकार थांबत नसल्यामुळे गृहमंत्रालयाने सीआयएसएफ, एनआयए आणि आयबीला तसेच विमान वाहतूक मंत्रालय तसेच नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागालाही सविस्तर अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
लँडिंगचे सत्र कायम
एअर इंडिया, इंडिगाे आणि विस्ताराच्या प्रत्येकी सहा विमानांत बाॅम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली हाेती. मुंबई, इस्तंबूल, अहमदाबाद, जाेधपूर, फ्रॅंकफर्ट, सिंगापूर, बागडाेगरा इत्यादी शहरांकडे ही विमाने झेपावली हाेती. धमकीनंतर आपत्कालीन लॅंडिंग करावे लागले.
बेळगाव विमानतळाला बॉम्बस्फोटाची धमकी
बेळगाव : विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मिळाल्यामुळे बेळगाव विमानतळावर एकच धावपळ उडवून युद्धपातळीवर तपासकार्य हाती घेण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सुरक्षा यंत्रणेने विमानतळाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी करून देखील आक्षेपार्ह काहीच आढळले नसल्याने विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.