नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता खासदारांच्या कार्यालयावरुन राजकीय महाभारत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांना कार्यालय न मिळाल्याने काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर, ह्या कार्यालयाचा वाद चांगलाच पेटला असून माजी खासदार नवनीत राणा यांच्या पत्रातून वेगळीच माहिती समोर आली.
अमरावती खासदार कार्यालय नेमकं कुणाचं? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. कारण, सध्या अमरावतीचं खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सील केलं आहे. याप्रकरणी आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, खासादर बळंवंत वानखेडे यांनी थेट दिल्लीतून खासदार कार्यालयाबाबत भूमिका स्पष्ट केलीय.
राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे या दोघांनीही अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयावर दावा केला आहे. पण, या संपूर्ण प्रकरणात नवनीत राणांचं पत्र चर्चेचा विषय ठरले. नवनीत राणांनी अमरावती खासदार कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं आणि त्यावेळी लिहिलेल्या पत्रात हे कार्यालय काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना देण्याची विनंती केली आहे. नवनीत राणांच्या पत्रामुळे अमरावतीतील खासदार कार्यालयाच्या वादात नवा ट्वीस्ट आला आहे. आता, या पत्रावर खासदार बळवंत वानखेडे यांनी भूमिका मांडली.
अमरावती लोकसभा मतदार संघात जिल्ह्याच्या ठिकाणी खासदार कार्यालय आहे. लोकसभा निवडणुकीत माझा विजय झाल्यावर मी ते कार्यालय मागितलं आहे. मात्र, ज्यांचा पराभव झाला ते कार्यालय सोडत नाहीत. आता राज्यसभेचे खा.अनिल बोंडे ते कार्यालय मागत आहेत. विशेष म्हणजे बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत, ते राज्यात कुठेही कार्यालय घेऊ शकतात. तरीही आता ते मगरीचे अश्रू गाळत आहेत, असे म्हणत अनिल बोंडे यांना अमरावतीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालय देण्यास अनिल बोंडेंनी विरोध दर्शवला आहे.
नवनीत राणांच्या सहानुभूतीची गरज नाही
नवनीत राणा यांच्या पत्रातून हे कार्यालय बळवंत वानखेडेंना देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावरुनही, वानखेडे यांनी नवनीत राणांना टोला लगावला. मला त्यांच्या (राणा) यांच्या सहानुभूतीची गरज नाही. अधिवेशन संपल्यानंतर मी पुन्हा जिल्हाधिकारी यांना पत्र देणार आहे. याबाबत, वाट पाहून पुढचा निर्णय घेऊ. जर कर्यायालय भेटलं नाही तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातच माझं ऑफिस थाटायचा निर्णय घेईल, असा इशाराही बळवंत वानखेडे यांनी दिला आहे.