काँग्रेसचे 84 वे अधिवेशन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पार पडले. या अधिवेशनात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली.
तसेच आम्ही जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आलो की जातीआधारित जनगणेचा कायदा मंजूर करू, असे राहुल गांधी म्हणाले.
तसेच या भाषणात बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. कटकारस्थान करून भाजपाने महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रातील मतदारांची यादी दिली जात नाहीये- राहुल गांधी
“देश आता कंटाळला आहे. तुम्ही बघा बिहारच्या निवडणुकीत काय होतं तर. भाजपाने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाहीये,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांचे मत बदलत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशाचा एक्सरे झाला पाहिजे - राहुल गांधी
“मला फक्त माझ्या कामात रस आहे. लोक काय म्हणतात, याने मला काहीही फरक पडत नाही. तेलंगाणात आम्ही क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. तेथे आम्ही जातीजनगणना करत आहोत. काही महिन्यांपूर्वी मी संसदेत एक भाषण केले होते. केंद्र सरकारने जातीजनगणना करावी, अशी मी मोदींकडे मागणी केली होती. या देशात दलित किती आहेत? मागस किती आहेत? मुस्लीम किती आहेत? आदिवासी किती आहेत? हे समजलं पाहिजे असं मी म्हणालो होतो. देशाचा एक्सरे झाला पाहिजे, अशी मागणी मी केली होती. पण मोदीजी, आरएसएसने आम्ही जाती जनगणना करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
भाजपाला कोणाची किती भागिदारी, हे लपवायचंय- राहुल गांधी
“या देशात दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना किती भागिदारी मिळते हे त्यांना लपवायचं आहे. लोकसभा, राज्यसभेत आम्ही जातीजनगणेबाबत कायदा मंजूर करू, असं म्ही म्हणालो होतो. तेलंगणात आम्ही हा कायदा आणला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.