पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले.
यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. काँग्रेससह अन्य पक्षांचे अनेक नेते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरकारची पाठराखण केली.
या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थिती लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या बैठकीला नव्हते आणि या बैठकीलाही नव्हते. संसदेपेक्षा आपण मोठे आहोत असे पंतप्रधानांना वाटत असेल. पण सध्याचा काळ टीका करण्याचा नाही.
संकटकाळात आम्ही कुणावरही टीका करणार नाही. देशाच्या हितासाठी काही विषय गुप्त ठेवण्यात आले आहेत, असे आम्हाला बैठकीत सांगण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सांगितले की, संकट काळात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. देशहितासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काँग्रेसने पूर्ण समर्थन दिले आहे. मल्लिकार्जून खरगे म्हणाले ते बरोबर आहे की, काही विषयांची चर्चा करायची नाही. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सर्वपक्षीय बैठकीत असलेल्या सगळ्याच पक्षांनी सरकारच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि किरण रिजेजू यांनी महत्त्वाची माहिती दिली.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थितांना सांगितले की, कुणाला ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती किंवा इतर काही गोष्टी, मुद्दे विचारायचे असतील तर ते विचारा. ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत संवदेनशील आहे. त्यामुळे सगळी माहिती आम्हाला देता येणार नाही. या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे नेते उपस्थित होते.